६ ऑक्टोबर २०२५ रोजी!
ठिकाण: पालघर
तारीख: ३० सप्टेंबर २०२५
तारा पाटील
जिल्हा प्रतिनिधी पालघर
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र सागरी मंडळाद्वारे विकसित होत असलेल्या महत्त्वाकांक्षी मुरबे पोर्ट प्रकल्पाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुरबे पोर्ट, राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला चालना देणारे एक महत्त्वाकांक्षी ग्रीनफील्ड डीपवॉटर पोर्ट असून, या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जेएसडब्यू मुरबे पोर्ट प्रा. लि. कडे सुपूर्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाची जनसुनावणी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक भागातील लॉजिस्टिक्सची कार्यक्षमता वाढण्याची, वाहतूक खर्च कमी होण्याची आणि राज्यासाठी अतिरिक्त जीएसटी महसूल निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर, आजूबाजूच्या भागांच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. मुरबे बंदर, ठाणे, वापी, तारापूर, पालघर आणि नजीकच्या औद्योगिक भागाच्या विकासात संतुलन राखण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा ठरेल. स्थानिकांकडून या प्रकल्पाविषयी सकारात्मक अपेक्षा आणि उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
मुरबे पोर्टच्या नियोजनात पर्यावरण, उपजीविका आणि सामाजिक विकासाशी निगडित सर्व महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यात समुद्रमार्ग, सागरी जीवसृष्टी, खारफुटी आणि किनाऱ्यांचे संवर्धन यासाठी विशेष पुनर्संचयितीकरण योजना, तसेच सुमारे १२३ हेक्टर हरितपट्टा विकसित करण्याची तरतूद आहे. याशिवाय, या प्रकल्पामुळे समुद्रपातळीत वाढ किंवा किनारपट्टीचे अपरदन होणार नाही, याची खात्री करून घेण्यात आली आहे.
या प्रकल्पामुळे कोणतेही गाव विस्थापित होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. तसेच, किनारपट्टीचे संवर्धन साधता येईल, अशी आखणी देखील करण्यात आली आहे. [प्रकल्पाचे स्थान तारापूर अणुऊर्जा केंद्रापासून सुरक्षित अंतरावर आहे.] पारंपरिक मासेमारीसाठी स्वतंत्र मार्ग व सुविधांची उभारणी, तसेच आधुनिक पायाभूत रचनेमुळे या क्षेत्राला नव्या व्यापारी संधी उपलब्ध करण्याचे योजिले आहे. जहाजांची हालचाल निश्चित मार्गानेच होणार असल्याने मच्छीमारांना कोणताही अडथळा येणार नाही.
रोजगाराच्या दृष्टीने, बांधकाम टप्प्यात सुमारे २,००० आणि परिचालन टप्प्यात सुमारे २,५०० थेट व अप्रत्यक्ष संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. बांधकाम, यांत्रिक-विद्युत कामे, सुरक्षा, वाहतूक, लॉजिस्टिक्स, कार्गो हाताळणी, शिपिंग, पर्यटन आणि स्थानिक पुरवठा साखळीत रोजगाराच्या संधी निर्माण होतील. स्थानिकांना रोजगार व कंत्राटी कामांमध्ये प्राधान्य दिले जाणार असून, परिसरातील सामाजिक-आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडवण्यावर भर असेल. तसेच, स्थानिक उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
मुरबे पोर्ट प्रकल्प पर्यावरणीय संतुलन आणि संवर्धनासाठी कटिबद्ध असून, सागरी किनारपट्टीवरील गावे आणि स्थानिक मासेमारांच्या उपजीविकेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. सर्व पर्यावरणीय अभ्यास सक्षम प्राधिकरणांकडून करण्यात आले असून, आवश्यक परवानग्या संबंधित विभागांकडून घेतल्या जाणार आहेत. पर्यावरणीय मुल्यांकन अहवाल हा केंद्रीय वनं व पर्यावरण मंत्रालयाच्या मार्गदर्शन सूचनांनप्रमाणे तयार करणायात आलेला आहे. सामाजिक कल्याणासाठी, प्रकल्पांतर्गत एकूण ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात सामुदायिक आरोग्य, शैक्षणिक सुविधा, मूलभूत सुविधा विकास, कौशल्यविकास उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि क्रीडा क्षेत्रातील सुधारणा यांचा समावेश आहे. या CSR उपक्रमांचा लाभ स्थानिकांना तातडीने मिळावा यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
मुरबे पोर्टविषयी
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे विकसित होत असलेले मुरबे पोर्ट, राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला चालना देणारे एक महत्त्वाकांक्षी ग्रीनफील्ड डीपवॉटर पोर्ट आहे. हे बंदर महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या दूरदृष्टीचा परिणाम असून, जेएसडब्यू मुरबे पोर्ट प्रा. लि. या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे.
आमचे उद्दिष्ट:
मुरबे पोर्टचे मुख्य उद्दिष्ट केवळ एक अत्याधुनिक बंदर उभारणे नसून, जागतिक दर्जाच्या लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा निर्माण करणे आहे. हे बंदर भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण करेल, ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला गती मिळेल.
प्रमुख वैशिष्ट्ये:
बहू-हंगामी कार्यान्वयन: हे बंदर कोणत्याही हवामानात २४/७ कार्यरत राहील, ज्यामुळे व्यापारात सातत्य राखले जाईल.
अखंड कनेक्टिव्हिटी: राष्ट्रीय महामार्ग आणि डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरशी (DFC) थेट जोडणीमुळे वाहतूक जलद आणि सुलभ होईल.
मल्टी-कार्गो हाताळणी: सिमेंट, स्टील, एलपीजी, एनपीजी, कंटेनर आणि इतर विविध प्रकारच्या मालाची हाताळणी करण्याची क्षमता.
पर्यावरणाची काळजीः विकासक पर्यावरण संरक्षणासाठी कटिबद्ध असून किनारी भागातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, ज्यामुळे विकासासोबत पर्यावरणाचा समतोल साधला जाईल.
भविष्यासाठी सज्ज: अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी नियोजन वापरून, मुरबे पोर्ट केवळ आजच्याच नव्हे तर भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी तयार होत आहे.
मुरबे बंदराचा विकास हा केवळ स्थानिक समाजाच्या समृद्धीपुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या आर्थिक वृद्धीचा मुख्य आधारस्तंभ ठरेल आणि भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था घडविण्याच्या राष्ट्रीय ध्येयात धोरणात्मक योगदान देईल.

























