तारा पाटील
जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर :- पालघर महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या वतीने विकसित होणारा पालघर जिल्ह्यातील मुरबे पोर्ट प्रकल्प आता महत्त्वाच्या टप्यावर पोचला आहे. या प्रकल्पाचा पर्यावरण परिणाम आकलन ( EIA ) मसुदा अहवाल २१ जुलै २०२५ रोजी तयार करून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला सादर करण्यात आला आहे. या अहवालावर लवकरच जन सुनावणी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा बंदर प्रकल्प पालघर जिल्ह्यातील मुरबे गावाजवळ उभारला जाणार आहे. प्रस्तावित मुरबे पोर्ट ची एकुण क्षमता दरवर्षी १३४.०७ मिलियन टन (MTPA), इतकी असणार आहे. येथे सिमेंट, स्टिल, एलपीजी, एनपीजी कंटेनर यांसह विविध प्रकारचा कार्गो हाताळला जाईल. प्रकल्पामध्ये १०किमी लांबीचा दुसरा दक्षिणेकडील ब्रेकवाॅटर १.३ किमी लांबीचा उत्तरेकडील ब्रेकवाॅटर १६ धक्के आणि १०३५ एकर जमीन समाविष्ट आहे. प्रकल्पासाठी आवश्यक पाणी पुरवठा सिंचन विभागाच्या सुर्या प्रकल्पातून करण्यात येणार असून वीज पुरवठा एम एस डी सी एल कडून केला जाणार आहे. बंदराला एन एच -४८ व मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वे सोबत जोडले जाईल. तसेच डेडिकेटेड फ्रेट काॅरिडोर (DFC) शी जोडण्यासाठी १३ किमी रेल्वे मार्ग बांधण्याचा प्रस्ताव असल्याचे समजते. या पोर्ट मध्ये एकुण ८ जेरी, कंटेनर व मल्टी पर्पज कार्गो टर्मिनल, बाल्क कार्गो टर्मिनल, एल एन जी व पेट्रोकेमिक्ल टर्मिनल यासारख्या अत्याधुनिक सुविधा उभारल्या जाणार असल्याचे सांगितले जाते.प्रकल्पाचे संचालन जे एस डब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लि. करणार आहे. मुरबे पोर्ट ला दहेज- बांद्रा आणि (DFC) रेल्वे नेटवर्क शी ही जोडण्याची योजना आहे. तयार झालेल्या पर्यावरण परिणाम मसुदा (EIA) अहवालानंतर आता जन सुनावणी ची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे समजते. ठराविक कार्यक्रमानुसार प्रकल्पाचे बांधकाम एप्रिल २०२६ पर्यंत सुरू होऊन मार्च २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीस नवी दिशा देणारा ठरणार आहे. असे सांगितले जाते. मुरबे पोर्ट हे राज्यातील एक महत्त्वाचे डिपवाॅटर पोर्ट ठरणार असून जगातील दर्जाचे लाजिस्टिक हब म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. आयात-निर्यात व्यपाराला गती मिळून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची स्पर्धात्मकता वाढेल. अशी अपेक्षा केली जात आहे. तथापि मुरबे व आसपासच्या गावातील ग्रामस्थ विशेषतः मच्छिमार समाज या प्रकल्पाला आपला विरोध करत असून आंदोलन करण्याची तयारी दर्शवत आहेत. आंदोलनाचा काय परिणाम होतो आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

























